Saturday 6 August 2016

(पुल गेला वाहुन...काहीच चुक नसताना पुलाला बट्टा लागला ...वाचा त्याचं दु:खं)
मी म्हातारा...
मी म्हातारा जिर्ण जुना
आयुष्यमान संपलेला
म्हातारपणात काठी टेकत
कसाबसा तरलेला...
सरणावर जायची वेळ माझी
पण स्वार्थानं मरु दिलं नाही
ज्यांनी मला जगवलं त्यांना
अजुन शहाणपण आलं नाही...
सावित्रीमाय भरुन आली
म्हातार्याला घेवुन गेली
जाता जाता आपल्यासोबत
अनेक चुली विझवुन गेली...
एवढा मोठा प्रलय घडला
माझा काय दोष नव्हता
दुर्दैवी त्या जीवांवर खरंच
माझा काय रोष नव्हता...
माझ्यासोबत त्यांनाही
सावत्रीनं पोटात सामावलं
माझं नव्हतच काही मागं
त्यांनी मात्र घरदार गमावलं...
जन्मभर सेवा केली
जाता जाता डाग लागला
कुठल्या जन्मीचा भोग रे देवा
कैक उंबर्यांचा बोल लागला...
आता तरी सुधरा रे
माणसांचे कैवारी समजणार्यांनो
बंद करा षढयंत्रे तुमची
मढ्याचे लोणी खाणार्यांनो...
साठी ओलांडलेल्या बापाला तुमच्या
लावाल का ओझी वहायला?
मरणासन्न अवस्थेही पाठवाल का
शेकडो टनांची दु:खं पेलायला?
क्षमा करा रे बाळांनो
मी दयेची भिक मागतो
इथे जीव कोण घेतो अन्
कलंक कुणाला लागतो...
इतिहासात काळा ठरलो
काय होता माझा गुन्हा
भग्नावस्थ होवुन अश्रु ढाळतो
मी म्हातारा जीर्ण जुना
मी म्हातारा जीर्ण जुना...